आशपाक पठाण, तांदुळजा (जि.लातूर) : मराठा आरक्षणास विरोध केल्याचा आरोप करीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा लातूर तालुक्यातील भोसा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा प्रतिकात्मक अंत्यविधी रविवारी करण्यात आला. सकाळी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. याप्रसंगी आंदोलकांनी मंत्री भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणला विरोध व मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने हे आंदोलन केले. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात आली. विसावा म्हणून भोसा गावातील मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय येथे अंत्यविधी टेकण्यात आला. त्यानंतर भोसा बस स्टॉप येथे प्रतीकात्मक पुतळ्याचे अंत्यविधी करण्यात आला. अंत्ययात्रेत एका तरूणाने मुंडण करून तिरडी धरली होती.
आंदोलनात निळकंठ, पिंपळगाव, गाधवड, तांदुळजा, व भोसा मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या अंत्यविधीसाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. यासंदर्भात शनिवारी मुरूड पोलीस ठाण्यात आंदोलकांनी निवेदन दिले होते.