लातूर : आमच्याकडील अशैक्षणिक कामे काढून घेऊन आम्हा शिक्षकांना केवळ शिकवू द्यावे, असा आक्रोश करीत जिल्ह्यातील शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यातील शिक्षक सामुहिक रजा देऊन आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
या मोर्चास शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा आक्रोश मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांनी जोरदार घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा,
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश विनाविलंब मिळावेत, २०२४-२५ वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी, शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनासोबत चर्चा करून दुरुस्ती करावी, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात कालिदास माने, परमेश्वर बालकुंदे, सुनीलकुमार हाके, शरद हुडगे, दयानंद बिराजदार, शिवाजीराव साखरे, दामाजी बालुरे, गौतम टाकळीकर, संतोष पिट्टलवाड, लायक पटेल, अरुण साळुंके, अरविंद पुलगुर्ले, तानाजी सोमवंशी, महादेव खिचडे, गोपाळ पडीले, रमेश गोमारे, आनंद जाधव आदींसह जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
बीएलओ कामातून मुक्त करावे...जिल्हा परिषद शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करावे, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व प्रमोशन तात्काळ घ्यावेत. जिल्ह्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार गेली दोन वर्षापासून रखडलेले आहेत. ते लवकरात लवकर वितरीत करण्याचे नियोजन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, न्याय मिळेपर्यत काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षक, शिक्षिका या आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.