लामजना : औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील दलित वस्तीतील वीजपुरवठा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्याने येथील रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली या छोट्या गावातील दलित वस्तीचा वीजपुरवठा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे. येथील रहिवाशांनी वारंवार महावितरणकडे ट्रान्सफार्मर दुरुस्तीची मागणी केली, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गावातील वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, वस्तीमधील वीजपुरवठा बंद आहे. पथदिवेही बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर बिघाडाचे प्रकार सातत्याने होत असतानाही महावितरणकडून उपाययोजना केली जात नसल्याचे वस्तीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. या संदर्भात महावितरणच्या येथील कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.