बाधित रुग्णांच्या संपर्कातील कमीत कमी ९ जणांच्या चाचण्या करण्याचे निर्देश आहेत. मात्र आपल्या जिल्ह्यात दिवसाला सरासरी सध्याच्या चाचण्यानुसार ४५ ते ५० रुग्ण सापडत आहेत. या सर्व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करण्याचे नियोजन केल्यास ४५० चाचण्या होऊ शकतात. सप्टेंबर महिन्यातील आढळलेल्या रुग्ण संख्येवरून हे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे दररोज ३ हजार १०० चाचण्यांचे उद्दिष्ट साधणे कसरतीचे आहे. तरीही स्थानिक प्रशासनाने आरोग्य संस्थांना चाचण्यांचे उद्दिष्ट दिले आहे.
आरोग्य संस्थांना चाचण्यांचे उद्दिष्ट
प्राथमिक आरोग्य केंद्र २५, ग्रामीण रुग्णालय ५५, जिल्हा उपरुग्णालय ११० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लातूर मनपा हद्द वगळून २०३० चाचण्यांचे उद्दिष्ट आहे. तर महानगरपालिकेला १ हजार १५० चाचण्या असे एकूण ३ हजार १८० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
चाचण्यांसाठी मुबलक साहित्य अन् मनुष्यबळ
सप्टेंबर महिन्यामध्ये रॅपिड आणि आरटीपीसीआर मिळून ३९ हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांत ९ हजार १८८ रुग्ण आढळले होते. पाॅझिटिव्हिटी २३.५ टक्के होती. या महिन्यात रुग्णाच्या संपर्कातील जवळपास ३ हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे मनुष्यबळासह साहित्यही उपलब्ध आहे.
चाचण्या वाढविण्याचे निर्देश आहेत. सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्येवरून जिल्ह्याला दररोज ३ हजार १८० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांना ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. - डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी