लातूर : औसा राेडवरील किडीज् इन्फाे पार्क स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना १८ जानेवारी राेजी घडली हाेती. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, घटनेपासून आराेपी शिक्षक पाेलिसांना गुंगारा देत हाेता. त्याला साेमवारी सकाळी राहत्या घरातून पाेलिस पथकाने अटक केली. लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा राेड परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आराेपी शिक्षक राहुल जे. पवार याच्याकडे गणित विषयाची खासगी शिकवणी लावली हाेती. दरम्यान, शिकवणे समजत नसल्याने तिने ती शिकवणी बंद केली. शिकवणी बंद केल्याचा राग मनात धरून, आराेपी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गात टाेमणे मारले. शिवाय, मानसिक त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून तिने १८ जानेवारी २०२३ राेजी राहत्या घरात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात कलम ३०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, घटना घडल्यापासून आराेपी शिक्षक राहुल जे. पवार याच्या अटकेसाठी पाेलिस पथक मागावर हाेते. ताे त्यांना सतत गुंगारा देत हाेता. दरम्यान, लातूर जिल्हा न्यायालयात त्याने वकिलामार्फत जामिनासाठी ३ फेब्रुवारी राेजी अर्ज दाखल केला हाेता. न्यायालयाने ताे अर्ज फेटाळून लावला. ताे औसा राेड भागातील घरी आल्याची माहिती खबऱ्याकडून पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी त्याला घरातून माेठ्या शिताफिने अटक केली. लातूर येथील न्यायालयात त्याला दुपारी हजर केले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती तपास अधिकारी शिवाजीनगर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी दिली.