लातूर : साहित्य आणि संस्कृती विकसित करण्याच्या कामी शिक्षक आघाडीवर राहिलेले आहेत़ आजवर झालेली साहित्य संमेलने शिक्षकांच्या सहकार्यामुळेच झाली आहेत़ शिक्षक आणि साहित्याचे नाते जवळचे आहे़ शिवाय, अव्वल दर्जाच्या प्रमुख लेखकांमध्येही शिक्षक जास्त आहेत. त्यामुळे शिक्षकच साहित्याचा खरा आधार आहे, असे प्रतिपादन शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी येथे सोमवारी केले़
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते लातूर येथील गिरवलकर सभागृहात बोलत होते़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, स्वागताध्यक्ष आ़ धीरज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रा़ बी़व्ही़ मोतीपवळे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, निवृत्त सनदी अधिकारी भा़ई़ नगराळे, महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, शिवाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़
इंद्रजीत भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता़’, तसेच ‘शिक बाबा शिक आता लढायला शिक़़़’ या दोन कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली़ यावेळी शैक्षणिक व साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़