शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करावे, असा शासन निर्णय असताना यासाठी अनुदानाची तरतूद केली असताना देखील वेतन वेळेवर होत नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. या दिरंगाईमुळे कर्जाची परतफेड वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकांचे सिबिल खराब होत आहे. यापुढील काळात वेतन दिरंगाई करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच गेल्या दीड वर्षापासून ट्रेझरीला गेलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात नाहीत, गतवर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर केले नाहीत, शिक्षकांच्या पदोन्नत्या कराव्यात, शिक्षक संघटनेची बैठक घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची दखल न घेतल्यास जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शरद हुडगे, सुभाष केंद्रे, रवी भोसले, विलास पाटील, व्यंकुराम बोलवळे, सुनील लोखंडे, बाळासाहेब येळापुरे, अरविंद धानुरे, अनिल सुवर्णकार, अजित शिरूर, भगीरथ रेड्डी, राम कवाळे, रामकिशन चिंचोळे, नंदकिशोर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षकांचे वेतन वेळेवर करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:24 AM