लातूर : हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र येथे तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू असून, नवीन व्हॉल्व्ह बसविण्यात येत आहेत. त्यामुळे लातूर शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २८ व २९ जुलैरोजी होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांनंतर होईल.
या दोन दिवसांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक दुरुस्ती तसेच व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती लातूर शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत ३६.०८ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. दररोज पाणीसाठ्यात वाढ होत असून, यंदाच्या पावसाळ्यात १६.५६६ दलघमी नवीन पाणी प्रकल्पात आले आहे. गेल्या २४ तासांमध्ये १.३७१ दलघमी पाणी वाढले आहे. त्यामुळे लातूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही.
मात्र, वारंवार जलशुद्धीकरणामध्ये बिघाड, तर कधी प्रकल्पावरील पंपांमध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने शहराला पाणीपुरवठा होत नाही. मागील दीड महिन्यापूर्वी तब्बल एक महिना अशुद्ध व गढूळ पाणी नळाला आले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. मनपालाही गढूळ व पिवळ्या पाण्याचे कोडे सुटत नव्हते. त्यात आता हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर पुन्हा तांत्रिक दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा वेळ जाणार आहे. परिणामी, पाण्याचे वेळापत्रक पुढे काही दिवस कोलमडणार आहे. असे या ना त्या कारणाने लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याला व्यत्यय येत असल्याची ओरड नागरिकांमध्ये असते.