लातूर : महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४ हजार ८०० रुपये करण्यात यावे. तसेच संघटनेकडून देण्यात आलेल्या यापूर्वीच्या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे बाबत दि. ३ एप्रिलपासून सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन ६ एप्रिलपासून सर्वानुमते तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले होते. संघटनेच्या मागणी संदर्भात उर्वरित प्रशासकीय कार्यवाही करून आवश्यक ते आदेश निर्गमित करून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया मे पर्यंत पूर्ण न झाल्यास तात्पुरत्या स्वरुपात स्थगित झालेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येत आल्याचे शासनाला कळविण्यात आले होते. यासंर्भात शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर मागणी केलेले ग्रेड पे मंजूर झालेला नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सदस्यांची नाराजी तीव्र वाढली आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन करावे, लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी लातूर जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर बेरूळे, उपाध्यक्ष गणेश सरोदे, कार्याध्यक्ष रामेश्वर गोरे, सचिव कुलदीप देशमुख, तहसीलदार संवर्गातून सौदागर तांदळे, रेणुकादास देवणीकर, धम्मप्रिया गायकवाड, उषाकिरण शिंगारे, काशिनाथ पाटील, नायब तहसीलदार संवर्गातील प्रवीण आळंदीकर, सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.