लातूर : वाहनांच्या सालेयन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आणि चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या वाहनधारकाचे छायाचित्र वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या व्हाॅटसॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आता लातुरातील ११ दुकानांतून त्या व्यक्तीला वस्तू खरेदी करण्यासाठी ‘सवलत कुपन’ देण्याचा अनाेखा उपक्रम हाती घेतला आहे. फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाईचा फटका लावण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे.
लातूर जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी लातुरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध उपाययाेजना राबविल्या आहेत. शिवाय, साेशल मीडियातून विविध पाेस्ट, व्हिडीओ व्हायरल करून प्रबाेधन केले जात आहे. अनेकांना पाेलिसी खाक्या दाखविला जात आहे. तर काहींवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आता पाेलिसांनी अनाेख्या पद्धतीने फटाका सायलेन्सरवर कारवाई केली जात आहे. यासाठी त्यांनी खास व्हाॅटसॲप क्रमांक जाहीर केला आहे. या व्हाॅटसॲपवर बदल केलेल्या, कर्णकर्कश सायलेन्सरचे फाेटाे टाका आणि विविध सवलतींचे कुपन्स मिळवा...अशीच धमाका ऑफर सुरू केली आहे.
पथनाट्यातून जनजागृती सुरू...लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाेलिसांकडून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नियम माेडणाऱ्यांवर थेट दंड आणि खटले दाखल केले जात आहेत. त्याचबराेबर सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे. वाहतुकीबाबत वाहनधारकांत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांचे आयाेजन केले जात आहे. शिवाय, सकारात्मक व्हिडीओ तयार करून ते व्हायरल केले जात आहेत.
८१४९८१६०४९ हा व्हाॅटसॲप...लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने ८१४९८१६०४९ हा व्हाॅटसॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी मॉडिफाय सायलेन्सर वापरणांऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष माेहीम आखली आहे. या व्हाॅटसॲपवर ‘नागरिकांनाे माहिती द्या अन् डिस्काउंट कुपन मिळवा’ अशी धमका ऑफर जाहीर केली आहे.