किनगाव (जि. लातूर) : धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून लोखंडी बाज आणि गाद्या राणी सावरगावकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा सोनवणेवाडी (ता. अहमदपूर) येथील विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन टेम्पो भस्मसात झाला. यात जवळपास १० लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून लोखंडी बाज व गाद्या घेऊन टेम्पो (एमएच १०, एडब्ल्यू ७०१०) राणी सावरगावकडे निघाला होता. हा टेम्पो किनगावजवळील सोनवणेवाडी येथे पोहोचला. तेव्हा गावाजवळ विद्युत खांब वाकला असल्याचे चालक सायस रुक्माजी कुंडगीर (रा. राणीसावरगाव, जि. परभणी) यास दिसले. त्यामुळे चालकाने विद्युत तारांचा अंदाज घेत टेम्पो पुढे घेत असताना अचानकपणे विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे चालकासह गाडीतील अन्य एकाने तात्काळ उडी घेऊन टेम्पोपासून दूर झाले. काही वेळात टेम्पोतील साहित्यास आग लागली आणि टेम्पोनेही पेट घेतला. यात जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी किनगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या घटनेत चालक व अन्य एकजण बालंबाल बचावले.