ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ९- उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे पाच दिवसीय गणरायांचे शुक्रवारी विसर्जन होते़ यावेळी पोलिसांनी एका ग्रामस्थावर हकनाक लाठीमार करुन त्यास जखमी केल्याचा आरोप करीत नागरिकांनी विसर्जन थांबविले. दरम्यान, सायंकाळी पोलिस उपाधीक्षक व ग्रामस्थांमध्ये झालेल्या चर्चेनंतर गणरायांचे विसर्जन करण्यात आले़
दावणगाव येथे यंदा एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे़ शुक्रवारी येथील पाच दिवसीय गणरायांचे विसर्जन होते़ त्याची तयारी सुरु असतानाच उदगीर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी डीजेच्या कारणावरुन गावातील उमाकांत सनगल्ले यांना काठीने जबर मारुन जखमी केल्याचा आरोप करीत ग्रामस्थ संतप्त झाले़ या घटनेचा निषेध करीत गावक-यांनी रस्त्यावर ठिय्या देवून सोनवणे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी लावून धरली.
तोपर्यंत गणरायांचे विसर्जन करणार नाही, असा पवित्राही गावक-यांनी घेतला. परिस्थिती तणावग्रस्त बनत चालल्याने पोलिस उपाधीक्षक अनिकेत भारती यांनी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास दावणगावास भेट दिली. त्यांनी गावकºयांशी चर्चा बराच वेळ चर्चा केली. तणाव वाढू नये, यासाठी उपाधीक्षकांनीही या घटनेबद्दल गावक-यांची माफी मागितली़ परंतु, नागरिक गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर बराच काळ अडून बसले होते़ रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही तोडगा निघाला नव्हता़
हकनाक मारहाण : ग्रामस्थांचा आरोप
उमाकांत सनगल्ले हे गणरायांपुढे लावलेले साऊंड सिस्टीम काढून नेत होते़ डीजे वर बंदी आणल्याने पोलिसांनीच भोंग्याचा पर्याय सुचविला होता़ त्यानुसार भोंगा लावून मिरवणूक काढण्यात येणार होती़ परंतु, पोलिस निरीक्षक राजकुमार सोनवणे यांनी विनाकरण सनगल्ले यांना काठीने जबर मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.