लातूर : काैटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे, असे म्हणून बनाव करणाऱ्या एका ताेतया न्यायाधीशाला पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविराेधात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एक तरुण मी कौटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे, असे म्हणून लातुरातील एका पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी अक्षरशः त्याचे म्हणणे खरे समजून एक पोलिस गाडी दिली. त्याला अंगरक्षकही दिला. तो शिवणखेड खु. (ता. अहमदपूर) या मूळगावी गेला आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यालाही उपस्थित राहिला. मीरअली युसूफअली सय्यद (३२, रा. इंडियानगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या ताेतया न्यायाधीशाचे नाव आहे.
आश्चर्य म्हणजे त्या पोलिस निरीक्षकाने कुठलीही चाैकशी न करता त्या तोतया न्यायाधीशाला पोलिस वाहन उपलब्ध करून दिले. हा तोतया न्यायाधीश शिवणखेड खुर्द येथील मूळगावी गेला. तेथे आमदारांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिला. विकासकामाच्या कार्यक्रमात त्या तोतया न्यायाधीशाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील काही नागरिकांना सय्यद याची तोतयागिरी लक्षात आली. तो न्यायाधीश नाही, असे लक्षात आले. त्यानंतर लातुरातील शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्याची बतावणी लक्षात आली. न्यायाधीश पदाबाबतही शंका आल्यानंतर त्याला तातडीने शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात कलम १७०, ४१७, ४१९ आणि ४२० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
त्याच्या बनवाबनवीचे पितळच पडले उघडे...
फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आल्यानंतर ताेतया न्यायाधीशाने वापरलेले खासगी वाहन पाेलिसांनी जप्त केले आहे. विशेष आश्चर्य म्हणजे, त्या तोतया न्यायाधीशाने एका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाशी संवाद साधला आणि त्यांनी त्याच्या बाेलण्यावर विश्वास ठेवला. याच बाेलण्यावर त्यांनी पोलिस वाहनही दिले. दरम्यान, बनवाबनवीचे पितळ उघडे पडल्यानंतर पाेलिसांनी त्याला अटक केली.