बेलकुंड (जि.लातूर) : औसा तालुक्यातील भादा एका पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांच्या प्रतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पाेलिस दलात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत ‘ते’ दाेन पोलिस कर्मचारी शिंदाळा लाे. (ता.औसा) येथील कलाकेंद्रालगत कारमधून उतरतात. उभा असलेल्या इतर दुचाकींची ते मोडतोड करत असल्याचे चित्र व्हिडीओत दिसून येत आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी असते, तेच पोलिस अशा प्रकारे वर्तन करत असतील, तर समाजाने यातून काय बोध घ्यायचा, याबाबत समाजमाध्यमांमध्ये सध्याला उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर अवैध व्यवसायाविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात औसा तालुक्यातील काही ठिकाणी माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. परिणामी, अल्पावधीतच पाेलिस दलाची मान उंचावण्याचे काम झाले. मात्र, दाेन दिवसांपूर्वी भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कला केंद्रावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पाेलिसांचीही अडचण झाली आहे. या व्हिडीओमध्ये भादा येथील दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा दिसून येत आहे. त्यांच्याकडून थांबलेल्या दुचाकीची मोडतोड करण्यात आल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा येथील २० डिसेंबर रोजीच्या मध्यरात्रीचा असल्याचे समाेर आले आहे. यात हे दोन पाेलिस कर्मचारी अशा प्रकारे दुचाकींची मोडतोड का करीत आहेत, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओची मात्र सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नेमकी काय कारवाई हाेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
व्हायरल व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती...भादा ठाण्यातील दाेघा पोलिसांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तो वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती लागला. याबाबत पाेलिस अधिकाऱ्याने दुजाेरा दिला आहे. या प्रकरणात शनिवारी सायंकाळपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.