उदगीर : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओरड गेल्या आठ-दहा वर्षांपासून आता कायमची बंद होवून हा तालुका टँकरमुक्त झालेला आहे. मात्र, जूनची ११ तारीख उजाडूनही तालुक्यात वृक्ष लागवडीचे अद्याप नियोजन झालेले नाही. शिवाय, जलयुक्त शिवार अभियानाचे अद्याप एकही काम सुरू झालेले नाही.
नोव्हेंबर महिना उजाडला की उदगीर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सुरू होत होती. जून ,जुलै मध्ये पाऊस चांगला होवून पाण्याची सोय होइपर्यंत तालुक्यात ३५ते ४० टँकर पाण्यासाठी सुरू असायचे. मात्र गेल्या ८ वर्षांपूर्वी तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे हा तालुका टँकरमुक्त झाला आहे. या कामासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी स्वयंसेवी संस्था, पदाधिकारी यांच्या बैठका घेतल्या जात होत्या. त्यामुळे या अभियानाला मोठी गती मिळाली होती. दरम्यान, उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बनशेळकी तलावात बेशरम वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून हा तलाव पूर्णपणे गाळाने भरलेला होता. जलसंचनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून या तलावातील गाळ उपसा करून बेशरम वनस्पती नष्ट केल्यामुळे हा एकटा तलाव आज घडीला उदगीरकरांची तहान भागवत आहे.
वृक्षलागवडीचे नियोजनही केलेले नाही...उदगीर तालुक्यात जून महिना उजाडण्यापूर्वी वृक्ष लागवडी संदर्भात वन व सामाजिक वनीकरण व स्वयंसेवी संस्था व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होवून तालुक्यात वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात असे. मात्र जूनची ११ तारीख उजाडलेली असताना अद्यापपर्यंत प्रशासनाकडून बैठक झाली नाही. शिवाय वृक्ष लागवडीचे नियोजन अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. वन विभागाकडून डिग्रस येथे केवळ एकरमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी मंजुरी मिळाल्यामुळे त्याठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी सूचना करूनही दुर्लक्ष...हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर उर्वरित १७ हेक्टर क्षेत्रावर याच वर्षी वन विभागाने वृक्ष लागवड सुरू करावी व तेथील मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी त्याठिकाणी सेंट्रल नर्सरी सुरू करावी, अशी सूचना उदगीरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी वन विभागाला केलेली असताना वन विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
जलयुक्त शिवारमध्ये केवळ आठ गावे...तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी तालुक्यातील केवळ आठच गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या कामांची अंदाजपत्रके तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. ही कामे मंजूर होताच आठ गावात जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू करण्यात येतील, असे जलसंधारण विभागाचे अभियंता काळोजी यांनी सांगितले.