लातूर : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या महिनाभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ( Amit Deshmukh) दिल्याने वैद्यकीय शिक्षकांनी आपले आंदोलन शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले आहे. त्यामुळे शनिवारपासून रुग्णसेवा देण्यास सुरुवात झाली आहे.
एमएसएमटीएच्या वतीने विविध मागण्यांसाठी ५१ दिवसांपासून आंदोलन सुरु होते. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय संचालकांसोबत वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यात अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापकांना सुधारित दराने व्यवसायरारेध भत्ता, इतर भत्ते व करिअर ॲडव्हान्सेंट स्कीम लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी लवकरच मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल, करार पध्दतीने रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यापूर्वी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या सहायोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक हे तदर्थ पदोन्नतीने जाण्यास इच्छुक असल्यास विषयानुसार व सेवा ज्येष्ठतेनुसार पात्रता तपासून तदर्थ पदोन्नतीने प्रथमत: रिक्त पदे भरणे व त्यानंतरही पदे रिक्त राहिल्यास ती करार पध्दतीने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे अन्य विविध लेखी आश्वासन देण्यात आले. सकारात्मक चर्चा झाल्याने वैद्यकीय शिक्षक संघटनेने हे आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले आहे, असे एमएसएमटीएचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते यांनी सांगितले.
अधिष्ठातांना पत्र...विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांना एमएसएमटीएच्या जिल्हा संघटनेने आंदोलन स्थगित करीत असल्याचे पत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. भाऊराव यादव, डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. अजय ओव्हळ, डॉ. महादेव बनसुडे, डॉ. विमल होळंबे- डोळे आदी उपस्थित होते.