किल्लारी : भूकंप प्रवण असलेल्या किल्लारी परिसरात बुधवारी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास गूढ आवाज आला. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अचानक भूगर्भातून आवाज आल्याने भूकंपच असेल म्हणून लोक घराबाहेर पडले. त्यामुळे १९९३ च्या भूकंपाच्या आठवणी जागृत झाल्या. दरम्यान, भूकंपमापक केंद्रावर या आवाजाची कसलीही नोंद झालेली नाही. गूढ आवाज आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले.
निलंगा तालुक्यातील हासोरी येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची घटना ताजी असतानाच किल्लारी परिसरात भूगर्भातून आवाज आल्याने भीतीचे वातावरण होते. भूकंपच असेल काही जणांचे म्हणणे होते; परंतु औराद शहाजानी, आशिव आणि लातूर येथील भूकंप मापक केंद्रावर या गूढ आवाजाची नोंद नाही. मात्र, गावातील नागरिक रात्रभर झोपले नाहीत. रात्र जागून काढली. काही सेकंदाचा आवाज आल्यानंतर पुन्हा दुसरा आवाज आलेला नाही. मात्र, या आवाजाचा अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी, आशिव आणि लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर या आवाजाची कोणतीही नोंद झालेली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.