औराद शहाजानी (जि.लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावामध्ये मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
औराद शहाजानी व परिसरात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस सुरू झाला. यात हलक्या गाराही पडल्या. पावसापेक्षा वादळी वारे जास्त हाेते. या वा-यात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. औराद, तगरखेडा, हालसी या रस्त्यावर झाडे उन्मळून तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या असल्याने रस्ते वाहतूकीसाठी बंद झाली आहेत. तगरखेडा, हालसी गावांना विद्युत पुरवठा करणारे विजेचे पाेल जमीनदोस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्याने या भागातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे भाजीपाला व फळबागांचे माेठे नुकसान झाले. शेतशिवारातील उन्हाळी सोयाबीनच्या बनिमी वा-यात उडुन गेल्या असून, प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तगरखेडा उपसरपंच मदन बिरादार यांनी केली आहे. दरम्यान, औराद शहाजानी हवामान केंद्रावर १० मि.मी. पाऊस झाला असल्याची माहीती हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.