निलंगा : निलंग्यात येऊन बँड वाजवायची कोणी भाषा करू नये. बँड तर निलंग्याचाच प्रसिद्ध आहे. तो आम्हीच वाजवू, अशी उपरोधिक टीका माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात केली. पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीचे लोकार्पण माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते म्हणाले, निलंग्यातील जनता स्वाभिमानी आहे. दादासाहेबांनी या तालुक्याला एकसंघ ठेवून स्वत:ची ओळख निर्माण केली. आपल्या कार्यकाळात पीव्हीआर चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते गंजगोलाई, शिवाजी चौक ते अंबाजोगाई रस्ता व्यवस्थित झाला. एवढेच नाही तर बाभळगावहून जाणारा लातूर-जहिराबाद मार्गही आम्ही केला. मात्र, मागील अडीच वर्षांत निलंगा तालुक्याला विकासनिधी का आला नाही, असा सवाल केला. कार्यक्रमास मुख्याधिकारी गजानन शिंदे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, संजय दोरवे, दगडू साळुंके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, कुमार चिंचनसुरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रकाश बोरफळे यांनी, तर सूत्रसंचालन शेषेराव ममाळे यांनी केले.
विकासासाठी विरोधकांशीही चर्चा...जिल्ह्यातील विकासासाठी विरोधातील लोकप्रतिनिधींनाही एकत्र येण्याचा आग्रह करू. त्यांना मी स्वत: भेटेन. मात्र, बँड वाजवायचीच वेळ आली, तर अनसरवाड्याचा बँड प्रसिद्ध आहे. तो आम्ही वाजवू. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी धोंडेजेवण कार्यक्रमात नवरदेव आणि बँडबाजा यावरून नामोल्लेख न करता मिश्किलपणे भाष्य केले होते. त्यावरून निलंग्याच्या बँडचा मुद्दा पुन्हा समोर आला.
होऊनच जाऊद्या, कोणी किती विकास केला?जिल्ह्यातील राजकारणामध्ये शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांनी एकत्र येऊन विकास साधला. तीच विकासाची भाषा समोर ठेवून काम करायचे आहे. कोणी कोणत्याही पक्षात असो, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तरच जिल्ह्याच्या विकास उंचीवर नेता येईल. आता निलंग्यात येऊन विकासाचे बोलण्यापेक्षा अडीच वर्षे तुम्हीही पालकमंत्री होते. मीही होतो. दोघेही एकत्र बसू, तुम्ही सांगा मी व्यवस्था करतो. होऊन जाऊ द्या कोणी किती विकास केला, असा सवाल करीत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली.