लातूर : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळअंतर्गत एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करून मुख्य कार्यालयास पाठविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी लातुरात घडली. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. च्या एक लाख रुपये थेट कर्ज योजनेअंतर्गत तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. दरम्यान, तो प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करून मुख्य कार्यालयास पाठविण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील लिपिक तातेराव काशिनाथ जाधव याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारदाराने पहिल्या टप्प्यात ५०० रुपये आणि उर्वरित लाचेची रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे मान्य केले.
दरम्यान, काही वेळाने ५०० रुपये घेऊन तक्रारदार हा सदरील लिपिकाकडे गेला. हे दोघे कार्यालयाच्या बाहेर भेटले. त्यानंतर ५०० रुपयांची लाच घेताना लिपिक तातेराव जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.