लातूर : जिल्ह्यातील तळेगाव (ता. अहमदपूर) येथील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी फाेडून राेकड, देवीचे साेन्याचे दागिने लंपास केले हाेते. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, यातील आराेपीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत २२ ते २३ जानेवारीच्या मध्यरात्री तळेगाव येथील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, देवीचे साेन्याचे दागिने चाेरल्याची घटना घडली होती. याबाबत अहमदपूर ठाण्यात गुरनं. ५१ / २०२४ कलम ४५७, ३८० भादंवीप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अहमदपूर डीवायएसपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या पथकाने आराेपीचा शाेध घेतला. दानपेटी फाेडणाऱ्या चाेरट्यांची खबऱ्याकडून माहिती मिळाली. याच्या आधारे एका आराेपीच्या मुसक्या आवळत विकास अनिरुद्ध डावरे (वय ३०, रा. अहमदपूर) याला अटक केली. कसून चाैकशी केली असता, साथीदारासह त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
चोरलेले साेन्याचे दागिने, रोख ५२ हजार असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने चाकूर हद्दीतही घरफोडी केलेले दाेन गुन्हे कबूल केले आहेत. त्याच्याकडून चाेरीतील मुद्देमाल जप्त केला असून, गुन्ह्यातील अन्य फरार आरोपींचा पाेलिस शाेध घेत आहेत. ही कारवाई सपोउपनि. आंदोरीकर, तानाजी आरदवाड, बापू धुळगुंडे, राजकुमार शिंदे, रूपेश कजेवाड, पाराजी पुठेवाड यांच्या पथकाने केली आहे.