हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : शेताच्या बांधावरील गवताला आग लागल्याचे पाहून ती आटोक्यात आणण्यासाठी गडबडीने जात असलेल्या एका शेतकऱ्याचा स्पर्श तुटलेल्या विद्युत वाहिनीला झाला आणि त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे मोरतळवाडी (ता. उदगीर) येथे घडली.
रामराव गणपती पेद्देवाड (६०, रा. मोरतळवाडी, ता. उदगीर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मोरतळवाडी येथील शेतकरी रामराव पेद्देवाड हे शुक्रवारी पहाटेच्या वेळी शेतातील पिकास पाणी देण्यासाठी गेले होते. तेव्हा काही अंतरावर असलेल्या बांधावरील गवतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. बांधानजिक उभा ऊस असल्याने त्यास आग लागेल या भीतीपोटी त्यांनी गडबडीने बांधावरील आग आटोक्यात आणण्यासाठी जात होते. तेव्हा शेतात विजेची तुटलेली तार पडली होती. त्या विद्युुत तारेस त्यांचा स्पर्श झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उशिरापर्यंत पेद्देवाड हे घरी न आल्याने कुटुंबियांनी शेताकडे जाऊन पाहणी केली असता रामराव पेद्देवाड यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळ त्यांनी घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेस्थळी पोहोचून पंचनामा केला.
घरातील कर्ता व्यक्ती गेला...रामराव पेद्देवाड यांना पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. त्यांना सहा एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते शेतीत काबाडकष्ट करायचे. मुलगा हा शिक्षण घेत आहे. दरम्यान, ही घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी सांगितले.