लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, जिल्ह्यात १६६९ जागांवर प्रवेश होणार आहेत. २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेली असून, ७ हजार ४५१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून बुधवारी ऑनलाईन पद्धतीने सकाळी ११ वाजता पुणे येथे काढण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा नंबर लागतो की नाही याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १ मार्चपासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले होते. १७ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, पालकांच्या मागणीनुसार २५ मार्चपर्यंत अर्जास मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार २०० शाळांमधील १६६९ जागांसाठी ७ हजार ४५१ अर्ज आले आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यस्तरावर सोडत काढली जाणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण व्हीसीद्वारे करण्यात येणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेश पाठविले जाणार आहेत. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.