- गोविंद इंगळेनिलंगा (जि. लातूर) : मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी कर्नाटकातील बसवकल्याणला निघालेल्या कारचा अपघात होऊन त्यात आई -वडिलांसह चुलती आणि चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वा. च्या सुमारास लातूर- जहिराबाद महामार्गावरील निलंग्याजवळ घडली.भगवान मोतीराम सावळे (५२), लता भगवान सावळे (४८), विजयमाला भाऊराव सावळे (५४), राजकुमार सुधाकर सावळे (३७, सर्वजण रा. आनंदनगर, चाकूर) असे मयत चौघांची नावे आहेत.
चाकुरातील आनंद नगरातील भगवान सावळे यांच्या मुलीचा विवाह ठरला होता. त्यामुळे भगवान सावळे, त्यांची पत्नी लता सावळे, भावजय विजयमाला सावळे, पुतण्या राजकुमार सावळे, शुभम सुनील सावळे (७), महेश भगवान सावळे (१९) हे सहा जण शुक्रवारी सकाळी कार (एमएच २४, एएफ १८४५) ने कर्नाटकातील बसवकल्याण येथे निघाले होते.
ते लातूर- जहिराबाद महामार्गावरील निलंग्यातील उदगीरमोडहून औराद शहाजनीच्या दिशेनेकडे निघाले असता निलंग्यापासून अवघ्या दोन किमी अंतरावर पोहोचले होते. तेव्हा उतारावर कारचा वेग वाढला आणि चालक राजकुमार सावळे याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले तर शुभम सावळे व महेश सावळे हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद निलंगा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी.ए. गर्जे हे करीत आहेत.
ताबा सुटला अन् कार १५ फुट खोल शेतात उलटली...चालकाचा वाहनावरील ताबा सुटताच कार महामार्गानजिकच्या १५ ते २० फुट खोल शेतात जाऊन उलटली. तसेच जवळपास ५०० मीटरपर्यंत कार फरफटत गेली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिस तात्काळ घटनास्थळी...या अपघाताची माहिती मिळताच निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ, पोलिस उपनिरीक्षक पी.ए. गर्जे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोघा जखमींना तात्काळ निलंग्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नागरिकांनी केली मदत...निलंग्यानजिक भीषण अपघात घडल्याची माहिती मिळताच नजिकच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. या नागरिकांनी आणि पोलिसांनी वाहनात अडकलेल्यांना मयतांना आणि दोघा जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले.