लातूर : भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील भाविकांनी मध्यरात्रीपासून रांगा लावून दर्शन घेतले. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने श्री सिद्धेश्वर देवालयाचा परिसर दुमदुमला.
महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या ७१ व्या यात्रा महोत्सवास मध्यरात्री गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने प्रारंभ झाला. रात्री १२ वाजता गवळी समाजातील युवकांनी श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक केल्यानंतर दर्शन सुरू झाले. महाशिवरात्रीनिमित्त सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम तात्या गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे, आप्पासाहेब घुगरे, विशाल झांबरे, व्यंकटेश हालिंगे, ओम गोपे आदींची उपस्थिती होती.
यंदा जागतिक महिला दिनी महाशिवरात्री यात्रेचा प्रारंभ झाला. यात्रा उत्सवाच्या ७१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते महिला तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटनही झाले.
मध्यरात्रीपासून भाविकांची गर्दी..मध्यरात्रीपासूनच श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. हजारोंच्या संख्येने तरुण- तरुणी, महिला व वृद्धांनी रांगा लावून दर्शन घेतले. यात्रा महोत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्तांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही मंदिर परिसरास भेट देऊन श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनास विविध सूचनाही केल्या.
मानाच्या काठ्यांची मिरवणूक...परंपरेप्रमाणे यावर्षीही मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विशाल गोजमगुंडे यांच्यासह परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर गौरीशंकर मंदिर येथे विश्वस्तांच्या हस्ते काठ्यांचे पूजन झाले. यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात काठ्यांची श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थानचे विश्वस्त व शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.