औराद शहाजानी (जि. लातूर) : पुण्याहून शिक्षणासाठी आजाेळी गुंजरगा (ता. निलंगा) येथे आलेल्या एका १८ वर्षीय नातवाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना औराद शहाजानी परिसरात रविवारी घडली. यात मृत्यू झाला असून, त्याच्या मृतदेहाचा शाेध पाेलिस, गावकऱ्यांच्या वतीने घेतला जात आहे. मात्र, सायंकाळपर्यंत मृतदेह हाती लागला नसल्याची माहिती पाेलिसांनी दिली. शाम व्यंकटराव जाधव (वय १८, रा. तळभाेग, हा.मु. गुजरंगा, ता. निलंगा) असे मृत युवकाचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तळभाेग (ता. बसवकल्याण, जि. बिदर) येथील रहिवासी असलेला शाम व्यंकटराव जाधव हा आई-वडिलांसह पुण्यात वास्तव्याला आहे. दरम्यान, ताे निलंगा येथील एका महाविद्यालयात सध्याला इयत्ता अकरावी वर्गात शिक्षण घेत आहे. ताे निलंगा तालुक्यातील गुंजरगा आजाेळी आला हाेता. रविवारी, मामाच्या शेतात आजाेबा आणि मामाचा मुलगा साेबत गेले हाेताे. मामाचा मुलगा गणेश लिंबाजी शिंदे हा लाेखंडी कलईत बसून तेरणा नदीपात्रातून गावाकडे गेला. यावेळी नदीपात्राच्या पाण्यात शाम जाधव हा पाेहत हाेता. पाण्याचा अंदाज न आल्याने ताे नदीपात्रातील पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मामाचा मुलगा कलई घेऊन आला. मात्र, ताेपर्यंत शाम हा पाण्यात बुडाला हाेता. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पाण्यात बुडालेल्या युवकाचा पाेलिस, स्थानिक गावकरी शाेध घेत असून, सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता. रात्र झाल्याने शाेधमाेहीम थांबविण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘आपत्ती व्यवस्थापन’चे पथक सकाळी हाेणार दाखल...
दरम्यान, युवकाच्या मृतदेहाची शोधमोहीम सायंकाळपर्यंत राबविण्यात आली. मात्र, रात्र झाल्याने शाेधकार्यात अडथळा आल्याने ती बंद करण्यात आली आहे. सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला शाेधकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.- उषा शृंगारे, तहसीलदार, निलंगा