उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील सुमठाणा येथील एका ९५ वर्षीय वृद्ध इसमाचा त्याच्याच नातवाने शेती वाटणीच्या कारणावरून लाकूड डोक्यात मारून व विटाने छातीत मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जात असताना वाढवणा पोलिसांनी अहमदपूर पोलिसांच्या मदतीने काही तासातच आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, सुमठाणा येथील दशरथ तुकाराम (वय ९५) यांच्या मुलाचे सुमठाणा ते चोंडी कोदळी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शेतात घर आहे. घरामधील व्हरांडयात रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बुद्धानंद राजेंद्र किवंडे याने वडिलांच्या नावावर असलेले घर व शेतीच्या वाटणीवरून आजोबा सोबत भांडण केले. भांडणादरम्यान आरोपीने आजोबाच्या डोक्यात लाकडाने मारून डोके फोडले आणि विटाने छाती व डोक्यात मारून गंभीर जखमी करून खून केला. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला.
खुनाची माहिती वाढवणा पोलीसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे गतिमान करुन आरोपी उदगीरहून बसने अहमदपूरकडे जात असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार अहमदपूर पोलिसांशी संपर्क साधून आरोपी अहमदपूर येथे बसमधून आल्यावर त्यास ताब्यात घेत वाढवणा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीचे वडील राजेंद्र दशरथ किवंडे (वय ६५ रा. सुमठाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड करीत आहेत.