चाकूर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, चाकूर पंचायत समितीमध्ये ध्वजारोहणाचा मान डोंबारी-भटक्या विमुक्त समाजातील महिलेस देण्यात आला. गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण असताना त्यांनी अनिता बंडेधनगर या महिलेस ध्वजारोहणाचा मान दिला. सोबतच साडी, चोळी देऊन गौरव केला.
गटविकास अधिकारी लोखंडे मंगळवारी कार्यालयाकडे येत असताना त्यांना एक महिला हातात पातेले, काखेत झोळी आणि त्यात शिळे तुकडे मागत असल्याचे निदर्शनास आले. लोखंडे यांनी त्या महिलेची विचारपूस केली असता महिलेस दोन मुले असून, पती व्यसनाच्या अधीन गेल्याचे सांगितले. उपजिविका भागविण्यासाठी भटकंती करणाऱ्या या महिलेची व्यथा ऐकल्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीअंतर्गत असलेल्या योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव ठेवला. तसेच महिलेचे शिक्षिकेच्या हस्ते साडी, चोळी देऊन औक्षण करण्यात आले.
त्यानंतर ध्वजारोहणाचा मान अनिता बंडेधनगर यांना देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन राठोड, सहाय्यक गटविकास अधिकारी संगमेश्वर कानडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विद्या लोमटे, गटशिक्षणाधिकारी संजय आलमले, कृषी अधिकारी शशिकांत गायकवाड, व्यंकट घोडके, माधव वागलगावे, अनंत पुट्टेवाड, तुकाराम उपरवाड, प्रदीप हलकांचे, महेश माने, प्रकाश रुपनर, संजय भाले, आशा मोतीपवळे, संग्राम भुरे, उमांकात पंढारकर, अतुल गायकवाड, मुक्तगीर मणियार, अर्चना कलशेट्टी, तानाजी सोळंके, उध्दव राठोड, प्रियंका गायकवाड, आशा भनगे उपस्थित होते.