लातूर : शिवणखेड (ता. चाकूर) येथे घर फाेडून अज्ञात चाेरट्यांनी साेन्याचे दागिने आणि राेख रक्कमेसह जवळपास ८ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत चाकूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील भगवान हरिबा शिंदे (वय ६५) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री घरात झाेपी गेले हाेते. दरम्यान, एका खाेलीत मुलगा आणि दुसऱ्या खाेलीत भगवान शिंदे झाेपले हाेते. शनिवारी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले साेन्याचे दागिने आणि राेख रक्कमेसह जवळपास ८ लाखांचा मुद्देमाल पळविला. भगवान शिंदे यांना पहाटे चारनंतर जाग आली. आपल्या घराचे दार उघडे कसे? म्हणून ते पाहिले असता, घरातील कपाटाचे काच फुटलेले, लाॅकर ताेडलेले आढळून आले. कपाटात ठेवलेले साेन्याचे दागिने पाहिले असता, ते दिसून आले नाहीत. याबाबत चाकूर पाेलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी चाकूर पाेलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, श्वानपथक, ठसे तज्ज्ञांच्या पथकाने भेट देवून पाहणी केली.
मुलाच्या खाेलीला कडी लावली...ज्या खाेलीत मुलगा झाेपला आहे, त्या खाेलीला चाेरट्यांनी बाहेरुन कडी लावली हाेती. यावेळी ताे लघुशंकेसाठी उठण्याचा प्रयत्न केला. तर बाहेरुन कडी लावल्याचे दिसून आले. त्यांनी बाहेरच्या खाेलीत झाेपलेल्या वडिलांना फाेनवर संपर्क साधला मात्र, फाेन उचलला नाही. अखेर वडिल झाेपी गेले आहेत म्हणून ताेही झाेपी गेला. पहाटे चार वाजता जाग आल्यानंतर चाेरट्यांनी घर फाेडल्याचा प्रकार उघडकीस आला.