लातूर : लातूर शहरासह, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी शहरांसह छोट्या-मोठ्या पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मांजरा प्रकल्पावर अवलंबून आहेत. जवळपास १० ते १५ लाख लोकांची तहान अन् हजारो हेक्टरचे सिंचन या प्रकल्पावर आहे. त्यामुळे प्रकल्प कधी भरतो याकडे तीन जिल्ह्यातील लोकांचे लक्ष असून सध्या धरणात थेंबे थेंबे पाणी येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात १२.७८ दलघमी पाणीसाठा नव्याने झाला आहे. सद्यस्थितीत धरणात २६.१० टक्के जिवंत पाणी साठा झाला आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत २९२ मिमी पाऊस झाला असून बुधवारी प्रकल्प क्षेत्रात ३३ मिमी पाऊस झाल्याने गेल्या २४ तासांमध्ये धरणात २.८ दलघमी नवीन पाण्याची आवक झाली आहे. गेल्या सोमवारपासून रिमझिम पाऊस होत आहे त्यामुळे धरणामध्ये अत्यंत हळुवार पाण्याचा येवा आहे. सोमवारी २२.९९ टक्के पाणीसाठा होता. बुधवारी त्यात वाढ होऊन पाणीसाठा २४.१२ टक्के झाला.२.११ टक्क्याची वाढ झाली. तर गुरुवारीही धरणात पाण्याची किंचित वाढ आहे. शुक्रवारी पुन्हा दोन टक्याने पाणीसाठा वाढला आहे. सद्यस्थितीत धरणात २६.१० टक्के जिवंत साठा म्हणजे ४६.१८६ दलघमी पाणीसाठा आहे.