राजकुमार जाेंधळे / लातूर : दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरून एका तरुणाचा चाकूने भाेसकून खून केल्याची घटना लातुरातील मध्यवर्ती बसस्थानक-हनुमान चाैक परिसरात मंगळवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली हाेती. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी तिघा आराेपींना अटक केली. दरम्यान, अन्य एका जखमी तरुणावर लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाेलिसांनी सांगितले, दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरून चाकूने भाेसकून खून करण्यात आल्याच्या घटनेची माहिती मिळताच सहायक पाेलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पाेलिस ठाण्याच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली. गुन्ह्यानंतर आराेपींचा शोध घेण्यात आला असता, आराेपींचा सुगावा लागला. काही तासांतच आराेपींच्या मुसक्या विविध ठिकाणांहून पाेलिसांनी आवळल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे राजपाल उर्फ राजू विठ्ठलराव गायकवाड (वय ३३, रा. विक्रमनगर, लातूर), अजय सोमनाथ घोडके (वय २७, रा. जुनी लेबर कॉलनी, लातूर), प्रवीण बाबुराव कांबळे (वय ४०, सावित्रीबाई फुले नगर, नांदेड, ह.मु. एलआयसी काॅलनी, लातूर) अशी आहेत. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. ६५२/२०२४ कलम १०३ (१), १०९, ११५, ३५१(२), ३५१(३) ३ (५) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास सपोनि. आर.आर. कऱ्हे करीत आहेत.
पाचही ठाण्यांच्या हद्दीत पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त...
सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, एमआयडीसीचे पाेनि. साहेबराव नरवाडे, शिवाजीनगर ठाण्याचे पाेनि. दिलीप सागर, अरविंद पवार, संतोष पाटील यांनी आपापल्या ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवला हाेता.
काही तासांच्या आत आवळल्या मुसक्या...
ही कारवाई स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले, विनोद चिलमे, खुर्रम काझी, दीनानाथ देवकते, रियाज सौदागर, युवराज गिरी, जमीर शेख, राजेश कंचे, संतोष देवडे, बंडू निटुरे यांच्यासह एमआयडीसी ठाण्याचे अंमलदार सचिन कांबळे, अर्जुन राजपूत, विनोद कातळे यांच्या पथकाने केली.