किल्लारी : ओम नम: शिवाय, हर हर महादेव, शिव शिव सांब सदाशिवच्या जयघोषात किल्लारीच्या श्री नीळकंठेश्वर मंदिरापासून निघालेली पालखी मिरवणूक परंपरेनुसार ईश्वर डोहावरील शिवलिंग पिंडीस भेट देऊन परतली. त्यानंतर आ. अभिमन्यू पवार, शोभाताई पवार यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना होऊन श्री नीळकंठेश्वराच्या यात्रेस गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गुरुवारी सकाळी ९ वाजता किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर मंदिरापासून पालखी सोहळा सुरु झाला. ढोल-ताशा आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हाती पताका घेऊन ओम नम:शिवाय, हर हर महादेव असा जयघोष करीत भाविक सहभागी झाले होते. जवळपास दहा किलोमीटर पालखी सोहळा झाला. सोहळ्यात हजाराेंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. पालखी मार्गावर जागोजागी महिलांनी रांगोळी काढली होती. तसेच फुलांची उधळण करुन पालखीचे स्वागत केले.
देवस्थान कमिटीच्या वतीने भाविकांच्या दर्शनासाठी मंडप, स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. मनोरंजनासाठी खेळणी स्टाॅल, हॉटेल, बच्चे कंपनीसाठी पाळणे, ब्रेक डॉन्स, वाहनांची पार्किंग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात्रा कालावधीत क्रीडामंत्री संजय बनसोडे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. धीरज देशमुख, आ. रमेश कराड, माजी आ. बस्वराज पाटील, माजी आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या हस्ते पुजा होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी इंगोले, सहायक पोलीस निरीक्षक नाना लिंगे, आबा इंगळे, मरडे, जाधव, कृष्णा गायकवाड, रवि करके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
११ दिवस चालणार यात्रा...श्री नीळकंठेश्वर यात्रा ११ दिवस चालणार असून, दररोज प्रवचन, भजन, रात्री नऊ ते बारापर्यंत किर्तन होणार आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया, रक्तदान, समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. यात्रेत इतर जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, मुलांची खेळणी, रहाट पाळणे, ब्रेक डान्स, विविध दुकानाही लागल्या आहेत. यात्रा यशस्वीतेसाठी राजेंद्र जळकोरे, बिसरसिंग ठाकूर, देविदास मिरकले, अंकुश भोसले, पप्पु भोसले, मडोळे गुरुजी, खंडू बिराजदार, शाम घोरपडे, राजु बिराजदार, गुरव पुजारी बांधव, अशोक गावकरे, प्रकाश पाटील, चंद्रकांत बाबळसुरे, सुभाष लोव्हार, नामदेव माळवदे, मनोहर गवारे आदी परिश्रम घेत आहेत.