निलंगा : एकविसाव्या शतकाकडे धावणाऱ्या व जगात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या देशात आजही शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी पाण्यातून कढईमध्ये बसून जावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतमाल घरी आणता येत नसल्याने अधिकचा खर्च करुन इतरत्र बाजारपेठेत न्यावा लागत आहे. ही व्यथा निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील शेतकऱ्यांची असून, पर्यायी पूल किंवा व्यवस्था प्रशासनाने करुन देण्याची मागणी होत आहे.
निलंगा तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर गुंजरगा गाव आहे. या गावातील २० ते २५ शेतकऱ्यांची शेती ही नदीच्या पलीकडच्या तीरालगत आहे. मात्र, नदीला पाणी असल्यामुळे गावाच्या लोकांनी लोखंडाची कढई तयार करून त्यातून आपल्या शेताकडे ये-जा करावी लागते. त्यातच शेतात झालेला शेतमाल गावाकडे घेऊन येण्यासाठी दळणवळणाची कसलीही सोय नाही. अन्नधान्याची पोती कढईतून आणणे शक्य नाही म्हणून घरासाठी लागणारे जेमतेम अन्नधान्य खांद्यावर घेऊन कढईतून प्रवास करून घराकडे घेऊन येतात. उर्वरित शेतमाल परस्पर निलंगा, औराद, लातूर याठिकाणी विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या भावात शेतमाल विकून मिळेल तेवढे पैसे पदरात पाडून घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही होते. यासंदर्भात ग्रामस्थांनी याठिकाणी किमान लोखंडी पूल करून पायवाट करून द्यावी अशी मागणी ग्रामसभेत अनेकवेळेला केली. मात्र, हे काम ग्रामपंचायतचे नसून संबंधित विभागाकडे पायपीट करूनही ग्रामस्थांना अद्याप यश आलेले नाही. किती दिवस कडईतून प्रवास करावा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांकडून सेतू पुलाची मागणी...नदीवरील या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी सेतूपूल बांधावा ही मागणी गेल्या चार पिढीपासून केली जात असल्याचे रामेश्वर धुमाळ यांनी सांगितले. शासनाकडे मोठ्या प्रमाणात बजेट उपलब्ध नसेल तर किमान लोखंडाचा छोटा पूल बनवून येण्या-जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शांतीलाल धुमाळ यांनी केली. नदीवर किमान मध्यम स्वरूपाचा बंधारा बांधावा म्हणजे त्यावरून ये-जा करण्यास सोपे जाईल. उन्हाळ्यात पाणी टिकून राहावे म्हणून पाणीही अडवता येईल व परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल असे विठ्ठल धुमाळ यांनी सांगितले.
लोखंडी बॅरेजेस, पूल बांधावा...नदीतून सुभाष धुमाळ, बालाजी धुमाळ, अनंत धुमाळ, समाधान धुमाळ, शांतीलाल धुमाळ, विठ्ठल धुमाळ, विनायक धुमाळ, बाळू धुमाळ, रामेश्वर धुमाळ, विमलबाई धुमाळ, दत्ता धुमाळ, सत्यवान धुमाळ, भगवान धुमाळ, पार्वती धुमाळ, संतोष धुमाळ, कोंडाबाई धुमाळ, विलास धुमाळ आदी शेतकऱ्यांना या त्रासाला रोजच सामोरे जावे लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून येथे लोखंडी पूल किंवा मध्यम स्वरूपाचे बॅरेजेस उभा करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.