लातूर : शहरातील पद्मानगरमध्ये घर फाेडून साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम असा मुद्देमाल अज्ञातांनी पळविल्याची घटना २१ ते २२ ऑक्टाेबरच्या रात्री घडली हाेती. दरम्यान, यातील एका आराेपीला एमआयडीसी ठाण्याच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून विविध गुन्ह्यात पळविलेली राेख रक्कम, साेन्या-चांदीचे दागिने, त्याचबराेबरच १४ माेबाइल असा १ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील पद्मानगर येथे एका घरात चोरट्यांनी २१ ते २२ ऑक्टोबरच्या रात्री प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. गुन्ह्यातील आराेपीच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. त्यांच्या आदेशानंतर एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाकडून आराेपींचा शाेध घेतला जात हाेता. दरम्यान, यातील आराेपींची खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे एकाला अटक केली. चाैकशीनंतर त्याने आपले नाव अक्षय प्रभाकर कणसे (वय २१, रा. प्रकाश नगर, लातूर) असे सांगितले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लातुरातील विविध ठिकाणांवरून चाेरी केलेले जवळपास १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे विविध कंपनीचे १४ माेबाइल चाेरल्याचे चाैकशीत कबूल केले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड, सहायक फौजदार भागवत मुळे, भीमराव बेल्लाळे, संजय फुलारी, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने, माधव आंबेकर, विनोद कातडे, मदार बोपले, नीलेश जाधव यांच्या पथकाने केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"