लातूर : विश्वासाने चारचाकी वाहन ताब्यात दिल्यानंतर परस्पर विल्हेवाट लावून वाहनमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात २००० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, २४ वर्षांपासून पाेलिसांच्या रेकाॅर्डवर फरार असलेल्या आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, वाहनमालक सुरज मारुतीराव साैदागर (रा. भाेई गल्ली, लातूर) यांनी करीम अहमदसाब उर्फ मईयोद्दीन शेख याला सन २००० मध्ये विश्वासाने चारचाकी वाहन ताब्यात दिले हाेते. आराेपीने टाटा सुमाे (एम.एच. २४ सी. १३६७) ही बाहेरगावी नेत परस्पर विल्हेवाट लावली. यातून तक्रारदार वाहनमालक सौदागर यांचा विश्वासघात केला. याबाबत लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुरनं. १३२/२००० कलम ४०८, ४९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, गत २४ वर्षांपासून आराेपी करीम अहमदसाब उर्फ मईयोद्दीन शेख हा पाेलिसांना गुंगारा देत फरार झाला हाेता. त्याचा शाेध घेतला असता, सुगावा लागत नव्हता. मात्र, करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गांधी चौक ठाण्यातील अंमलदार दत्तात्रय शिंदे यांना खबऱ्याने माहिती दिली. संशयित आरोपी हा महसूल कॉलनी, पाण्याच्या टाकीनजीक राहत आहे. या माहितीच्या आधारे आराेपीच्या मुसक्या आवळल्या.
लातूर न्यायालयात आराेपीला हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, पोउपनि. मोमीन, राम गवारे, दत्तात्रय शिंदे, रणवीर देशमुख, शिवाजी पाटील यांच्या पथकाने केली.