उदगीर (जि. लातूर) : येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोणी गावच्या एका व्यक्तीने गत दाेन आठवड्यांपासून पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घ्यावी, यासाठी खेटे घातले. मात्र, पाेलिस आपली तक्रारच दाखल करून घेत नाहीत, म्हणून संबंधित तक्रारदाराने विषारी द्रव प्राशन करून ठाण्यात प्रवेश केला. यावेळी पाेलिस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारताे, असे म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उदगीर येथील ग्रामीण पाेलिस ठाण्यात शनिवारी घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात एकाविराेधात गुन्हा नाेंद केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील लोणी येथील रहिवासी बालाजी श्रीराम फड हे शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तोंडाला पांढरा गमजा बांधून उदगीर येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाले. गेल्या दाेन आठवड्यांपासून ‘माझ्या अर्जावर पोलिस कारवाई का करत नाहीत?’ म्हणून अशी विचारणा केली. मी गेल्या १५ दिवसांपासून आपल्या ठाण्यात खेटे मारत आहे. तरीही आपण माझ्या तक्रारीची दाखल का घेत नाहीत? असे म्हणून, त्रासलेल्या तक्रारदाराने विषारी द्रव प्राशन करणार आहे असे म्हणत, त्याच्या तोंडाचा उग्र वास येत होता. त्याला बसा आणि तुमची तक्रार काय आहे? असे म्हणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने विचारणा केली असता. तो बाहेर येऊन पायऱ्या चढून वर जाऊ लागला. वरून खाली उडी मारतो, असे म्हणाला. त्याला पकडून खाली आणले असता, त्याच्या तोंडातून पांढरा फेस येत असल्याचे आढळून आले. त्याला उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पोहेकॉ. नामदेव धुळशेट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी श्रीराम फड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.