औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटकातून नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. मंगळवारी चमकी व पाेपटी मुगाला ११ हजार १ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. हा भाव आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. विक्रमी भाव मिळत असल्याने कर्नाटकातील मुगाची आवक वाढत आहे.
जूनमध्ये पेरणीयाेग्य पाऊस न झाल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी व परिसरात जुलैमध्ये पेरण्या झाल्या. उशिरा पेरण्या झाल्याने मुगाचा पेरा घटला. परिणामी, यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना काेरडा गेल्याने थोड्याफार प्रमाणात पेरणी झालेला मुग शेतकऱ्यांच्या हाताला लागला नाही. परिणामी, या भागातून बाजार समितीत आवक नाही. शेजारील कर्नाटकातील अनेक भागात मुगाची लवकर पेरणी झाली हाेती. त्यामुळे काही प्रमाणात मुगाचे उत्पादन झाले.
औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असल्याने येथे पंधरा दिवसांपासून काही प्रमाणात मुगाची आवक होत आहे. सुरुवातीला नवीन मुगाला ९ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. परंतु, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुगाचे उत्पादन घटल्यामुळे आवक नाही. परिणामी मुगाच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पोपटी अन् चमकी मुग विक्रीसाठी...मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पोपटी व चमकी मुगाला ११ हजार १ रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे कर्नाटकातील शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत ११७ क्विंटल पोपटी मुग तर १५ क्विंटल चमकी मुगाची आवक झाल्याचे बाजार समितीचे निरीक्षक चंद्रपाल कांबळे यांनी सांगितले.