वडवळ ना. (जि. लातूर) : बाजारपेठेत टोमॅटोचे दर कोसळल्याने तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही पदरी पडत नसल्याने चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. एवढेच नव्हे तर काही शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकत आहे. सध्या बाजारात टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला शंभर ते अडीचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरातील बहुतांश शेतकरी फुलकोबी, पत्ता कोबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, काकडी, कारले आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. जवळपास ४०० हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड असते. यात ७०० पेक्षा अधिक जास्त एकरवर टाेमॅटोची लागवड असते. येथील टोमॅटोला हैदराबाद, विदर्भ, पुणे, मुंबई, बेंगलोर, नाशिकसह परराज्यात मागणी असते. तसेच दरवर्षी भावही चांगला मिळतो.यंदाही येथील शेतकऱ्यांनी जूनमध्ये टोमॅटोची लागवड केली. त्यानंतर खत टाकणे, बांबू रोवणे, तारा ओढणे, फवारणी अशी कामे केली. सध्या टोमॅटो तोडणीसाठी आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी करुन बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवित आहेत. परंतु, बाजारात २० किलोच्या कॅरेटला १०० ते २५० रुपयांपर्यत भाव मिळत आहे. त्यातून तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तोडणीही बंद केली आहे. तर काही शेतकरी शेतातील टोमॅटो जनावरांच्या दावणीला चारा म्हणून टाकत आहेत.
एकरी लाखापर्यंत खर्च...टोमॅटो लागवडीपासून ते उत्पादन निघेपर्यंत शेतकऱ्यांचा एकरी लाखापर्यंत खर्च होतो. एका एकरातून किमान ६० टन उत्पादन अपेक्षित असते. यंदा अपेक्षित उत्पादन मिळत असले तरी बाजारपेठेत दर कमी असल्याने टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत कॅरेटला २२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.
भावच नसल्याने अडचण...मी जूनमध्ये ८ एकरवर टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी आतापर्यंत जवळपास ६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. सध्या टोमॅटो तोडणीस आला आहे. परंतु, बाजारात भाव नाही. त्यामुळे सध्या तोडणीच बंद केली आहे. कारण तोडणी, वाहतुकीचा खर्च परवडत नाही.- नूर पटेल, शेतकरी.
गेल्या वर्षी दसऱ्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोच्या एका कॅरेटला २२०० रुपये भाव होता. त्यामुळे आम्ही जूनमध्ये चार एकरवर लागवड केली. आता खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे मोठी चिंता लागली आहे.- गंगाधर वडिले, शेतकरी.