लातूर : प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जलस्रोतांची तपासणी केली जाते. काही वेळेस ही तपासणी विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस पाणी नमुने तपासणी संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आता गावातच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे.
बहुतांश आजार हे पिण्याच्या पाण्यातून उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकाने शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, गावास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा म्हणून दक्षता घेतली जाते. दरम्यान, ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी गावातील जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणीसाठी जिल्हास्तरीय प्रयोगशाळेकडे पाठवितात. बहुतांश वेळा तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर नमुने प्रयोगशाळेत येत नाहीत. परिणामी, तपासणीवर परिणाम होतो. अशी समस्या उद्भवू नये म्हणून पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आता गावातच जलस्रोतांची तपासणी हाेणार आहे.
पाण्याची रासायनिक अन् जैविक तपासणी होणार...जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत रासायनिक आणि जैविक अशा पद्धतीने जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. आता हीच तपासणी गाव पातळीवर केली जाणार आहे. त्यासाठी जलजीवन मिशनच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडे तपासणी किट उपलब्ध करण्यात आले आहेत. ते लवकरच गाव पातळीवर वितरित केले जाणार आहेत.
तपासणी किटसाठी ३७ लाखांचा खर्च...पाणी तपासणी किटसाठी एकूण ३६ लाख ९४ हजारांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यात जैविक संचासाठी ९ लाख २८ हजार तर रासायनिक किटसाठी २७ लाख ६६ हजारांचा निधी आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के तर राज्य शासनाकडून ४० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
तपासणीचे लवकरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण...गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. तपासणीचे लवकरच या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक स्रोताच्या तपासणीकरिता काही मानधनही दिले जाणार आहे.
दर महिन्यास तपासणी आवश्यक...पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात नळाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नमुने, शाळा- अंगणवाड्यांतील जलस्रोतांचे नमुने घेऊन त्याची प्रत्येक महिन्यास रासायनिक आणि जैविक तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होते.
उपाययोजना करण्यास मदत...लवकरच गाव पातळीवर जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी तपासणी किट वितरित केली जाणार आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता समजेल आणि तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होईल.- मोहन अभंगे, डेप्युटी सीईओ.