लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची सध्या आवक घटली आहे. गेल्या महिनाभरापासून साेयाबीनचा प्रतिक्किंटल भाव हा पाच हजारांच्या आतच अडकला आहे. ज्यांनी भाव वाढेल म्हणून घरात साेयाबीन ठेवले आहे, त्यांचे माेठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी आहे त्या दरात साेयाबीन विक्रीसाठी काढले आहे. साडेचार हजारांच्या आसपास भाव रेंगळात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्याला खरिपाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. परिणामी, बी-बियाणे खरेदीसाठी लातुरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी हाेत आहे. खरिपाच्या पेरणीासाठी भांडवल म्हणून काही शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला शेतमाल आडत बाजारात विक्रीसाठी आणला आहे. जेमतेम शेतमालाची आवक असली तरी शेतीमालाला याेग्य ताे भाव नाही. साेयाबीनला गत महिनाभरापासून ४५०० ते ४७०० रुपयांच्या घरात प्रति क्विंटल भाव मिळत आहे. बुधवार, १४ जून राेजी लातुरात साेयाबीनला प्रतिक्विंटल कमला भाव ५ हजार ७५ रुपये हाेता. किमान भाव ४ हजार ६९० रुपयांवर तर सर्वसाधारण भाव हा ४ हजार ९५० रुपयांच्या घरात हाेता. गुरुवार, १५ जून राेजी साेयाबीनला कमाल भाव ५ हजार ५०० रुपयांवर मिळाला. किमान भाव ४ हजार ८८० रुपयांवर तर सर्वसाधारण भाव हा ५ हजारावर मिळाला आहे. शुक्रवार, १६ जून राेजी साेयाबीनला प्रतिक्विंटल कमाल भाव ५ हजार १६२ रुपयावर मिळाला. किमान भाव ४ हजार ७७० आणि सर्वसाधारण भाव हा ५ हजार रुपये मिळाला आहे.
आडत बाजारात जेमतेम आवक...लातुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची जेमतेम आवक सुरु आहे. बुधवार, १४ जून राेजी एकूण आवक ११ हजार ५४५ क्विंटल झाली आहे. गुरुवार, १५ जून राेजी यामध्ये घट झाली असून, ती १० हजार ९६९ क्विंटलवर झाली हाेती. तर शुक्रवार, १६ जून राेजी ती काही प्रमाणात वाढली असून, ११ हजार २८० क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे.