लातूर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर लोकसभेसाठी २८ उमेदवार मतपत्रिकेवर आहेत. ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतली आहे. दरम्यान, गत निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस उमेदवारांत लढत होणार हे स्पष्ट झाले असले तरी वंचित फॅक्टरही चर्चेत राहणार आहे.
लातूर लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण १९ लाख ७९ हजार १८५ एवढे मतदार आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. दरम्यान, २८ उमेदवार रिंगणात राहिले असले तरी प्रमुख लढत महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे, महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात होईल. वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर आणि अन्य पक्षांचेही उमेदवार रिंगणात आहेत. तथापि, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात पुनर्रचनेनंतर गेल्या दोन टर्मपासून कमळ फुलले आहे. आता हॅट्ट्रिकसाठी त्यांचा प्रयत्न आहे, तर काँग्रेसने गतवैभव प्राप्त करण्यासाठी ही निवडणूक मनावर घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही गत निवडणुकीत पडलेल्या मतांचा टक्का कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
या निवडणुकीत १८ उमेदवार वाढले...२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लातूर लोकसभेसाठी नोटासह एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. २०२४ च्या या निवडणुकीत २८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने दोन बॅलेट युनिट प्रत्येक केंद्रावर लागतील. १८ उमेदवार या निवडणूकीत वाढले आहेत.
मागच्या निवडणुकीचा मागोवा...२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना ६ लाख ६१ हजार ४९५ मते मिळाली होती. २ लाख ७९ हजार १०१ मतांची आघाडी घेत ५६.५२ टक्के मते त्यांना मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ मते मिळाली हती. ३१.५६ टक्के मते त्यांना होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांच्या पारड्यात १ लाख १२ हजार २५५ मते पडली. ९.५४ टक्के या मतांची टक्केवारी होती.