हाळी हंडरगुळी (लातूर) : हौसेला मोल नसते या उक्तीप्रमाणे एका पशुपालकांने बैलजोडी खरेदीला लाखो रूपये मोजले. उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार बहरत असल्याने खरेदी विक्री वाढली आहे. गत बाजारात एका बैलजोडीला तब्बल तीन लाख एकावन्न हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागली. त्यामुळे या बैलजोडीची चर्चा नागरिकांतून होत आहे.
हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निजामाने सुरू केलेल्या येथील जनावरांच्या बाजाराचे महत्त्व आजही कायम आहे. येथील बाजारात गायी, म्हशी, बैल आदी जनावरांची खरेदी विक्री होते. शनिवार, रविवार व सोमवार असा तीन दिवस हा बाजार चालतो. येथील बाजारात देवणी, लाल कंधारी, गावरान, संकरीत आदी जातींची जनावरे विक्रीसाठी येत असल्याने पशुपालक, शेतकरी खरेदी विक्री साठी प्राधान्य देतात. विजयादशमी नंतर येथील बाजार सुरू होतो. सध्या बाजार बहरात आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने पशुपालक पशुपालनाकडे वळल्या चे चित्र पहावयास मिळत आहे. दुधाळ जनावरांच्या किंमती साठ ते सत्तर हजार रूपयांपर्यंत तर चांगल्या बैलजोडीची किंमत लाखांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. रविवारच्या बाजारात एका बैलजोडीला तब्बल तीन लाख एकावन्न हजार रुपये इतकी किंमत मिळाली. आतापर्यंतच्या किंमतीत ही सर्वाधिक किंमत असल्याचे बोलले जात आहे. वंजारवाडी येथील पशुपालक हरीदास गोपाळराव जाधव यांची बैलजोडी कंधार तालुक्यातील एका शेतकऱ्याने खरेदी केली. खरेदी विक्री चा व्यवहार झाल्यानंतर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
राज्यासह परराज्यातून पशूधन दाखल...हंडरगुळी येथील पशूधनाच्या बाजारात राज्यासह परराज्यातील पशूधन खरेदी-विक्रीसाठी येत आहे. येथील जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निजामाने सुरू केलेल्या येथील जनावरांच्या बाजाराचे महत्त्व आजही कायम आहे. रविवारी वंजारवाडी येथील पशुपालक हरीदास जाधव यांची बैलजोडी कंधार तालुक्यातील एका शेतकऱ्याने खरेदी केली. खरेदी विक्रीचा व्यवहार ३ लाख ५१ हजार रुपयांनी झाला असून, बैलजोडी पाहण्यासाठी पशूपालकांनी गर्दी केली होती.