किनगाव (जि. लातूर): येथील एक इलेक्ट्रिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्याने एक लॅपटॉप आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना किनगाव येथे मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.
किनगाव येथील रहिवासी सुशेन दहिफळे यांचे प्रमुख रस्त्यालगत असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. या इलेक्ट्रिकल दुकानचे शटर उचकून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील ४५ हजारांचा लॅपटॉप आणि रोख १ लाख ५ हजार रुपये पळविल्याची घटना मंगळवारी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सुशेन दहिफळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून किनगाव पाेलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविराेधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
घटना सीसटीव्ही कॅमेऱ्यात कैद...ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सातत मोबाईल दुकानासह अन्य दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच आहे. चाेरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने व्यापारी, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.