नळेगाव : लातूर-उदगीर मार्गावरील घरणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम चालु असल्याने वाहतूकीसाठी तात्पुरता पुल तयार करण्यात आला होता. साेमवारी सांयकाळपासून झालेल्या जोरदार पावसाने तात्पुरता पुल वाहून गेल्याने काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळविली आहे.
लातूर-नळेगाव-उदगीर या रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. मात्र, घरणी नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. वाहतूकीस अडथळा नको म्हणून तात्पुरता पुल उभारण्यात आला होता. मात्र, साेमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. अहमदपूरच्या उपविभागीय महसूल अधिकारी मंजुषा लटपटे आणि चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच लातूर - उदगीरला मार्गावरील वाहतुकीसाठी लातूर-चाकूर-उजळंब-कबणसांगवी -उदगीर रस्ता- मार्गे उदगीर (येरोळमोड जवळ), लातूर-चाकूर -उजळंब- रोहिना -हेर कुमठा -तोंडारमार्गे उदगीर तसेच लातूर-लातूर रोड -सावरगाव -भाटसांगवी- अंजनसोंडा- उदगीर यासोबत शिरूर अनंतपाळमार्गेही लातूर ते उदगीर वाहतूक वळविण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांकडून पाहणी...लातूर-उदगीर मार्गावरील घरणी नदीवर पुलाचे काम सुरु असल्याने तात्पुरता पुल पावसात वाहून गेला. मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन संबधित ठेकेदाराशी संवाद साधला. तसेच तातडीने काम पुर्ण करण्याच्या सुचना केल्या.