लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत संवर्ग- ३ पदावर नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने दरवर्षी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा शनिवारपासून होणार असल्याने नवीन कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले असून हे कर्मचारी जिल्हा परिषदेतील नियम, अधिनियम, कार्यालयीन कामकाजाचा अभ्यास करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत संवर्ग- ३ या पदावर नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची शासनाकडून दरवर्षी डिसेंबरमध्ये सेवा प्रवेशोत्तर लेखी परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा काही तांत्रिक प्रशासकीय अडचणींमुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून शनिवार व रविवार या दोन दिवसांत ही परीक्षा होत आहे. शनिवारी सकाळी व दुपारी आणि रविवारी सकाळच्या सत्रात परीक्षा होणार आहे. एकूण तीन विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे.
सेवा प्रवेशोत्तर परीक्षेसाठी जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीअंतर्गतचे एकूण १०४ कर्मचारी परीक्षार्थी आहेत. ही परीक्षा शहरातील बार्शी रोडवरील नीळकंठेश्वर माध्यमिक विद्यालयात होणार आहे. केंद्रप्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ हे राहणार आहेत.
१०० गुणांची प्रश्नपत्रिका...सेवा प्रवेशोत्तर परीक्षेसाठी एकूण तीन विषय आहेत. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका ही शंभर गुणांची असते. जिल्हा परिषदेचे नियम, ग्रामपंचायतीचे अधिनियम, लेखा संहिता, सर्वसाधारण भरती, निलंबन, सेवा प्रवेश नियम, इतर कार्यालयीन कामकाज अशासंदर्भात प्रश्न असतात.
चार वर्षांत तीन संधी...सेवा प्रवेशोत्तर परीक्षा ही जिल्हा परिषदेअंतर्गतच्या संवर्ग ३ मधील नवीन कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्षांत तीनदा संधी दिली जाते. त्यात यश न आल्यास उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येते. शनिवारपासून दोन दिवस परीक्षा होत आहेत.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.
परीक्षेत खाजगी नोट्स वापरु नयेत...या परीक्षेसाठी शासनाकडून प्रकाशित झालेल्या नियम/ अधिनियमांची अधिकृत पुस्तके अथवा पुस्तकांच्या छायांकित प्रतींचाच वापर करणे, अपेक्षित आहे. नोट्स अथवा खाजगी पुस्तकांचा परीक्षेसाठी वापर करु नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.