राजकुमार जाेंधळे / लातूर : एटीएम मशीनला तारेचा फास टाकून ती उखडून तब्ब्ल २६ लाखांसह मशीनच एका चारचाकी वाहनातून पळविल्याची घटना शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथे शुक्रवारी पहाटे १:५० वाजता घडली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांच्या अटकेसाठी चार पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
पाेलिसांनी सांगितले, गणेश दत्तात्रय कानुरे (वय ३५, रा. महादेवनगर, उदगीर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील नांदेड-बिदर महामार्गालगत असलेल्या एका काॅम्प्लेक्समधील एटीएम मशीन अज्ञात चार ते पाच चाेरट्यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर राेजी पहाटे १:५० वाजण्याच्या सुमारास एटीएम मशीनला तारेचा फास टाकून मशीन उखडली. ती मशीन एका चारचाकी वाहनातून तब्बल २६ लाख ५८ हजार २०० रुपयांसह पळविली. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक देडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक तोटेवाड करीत आहेत.
तपासासाठी चार पथकांची नियुक्ती...
शिरुर ताजबंद येथील एटीएम मशीनच चोराट्यांनी २६ लाखांच्या रोकडसह पळविल्याने एकच खळबळ उडाली असून, चोरट्यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पाेलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशेला तैनात करण्यात आली आहेत. लवकरच यातील चाेरट्यांना अटक केली जाईल. - सोमय मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, लातूर