लातूर : शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आगीच्या घटना घडत आहेत. लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास एका कारला अचानक आग लागली. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
लातूर शहरासह जिल्ह्याचा पारा रविवारी ४१ अंशांवर पोहोचला होता. गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरणासह टप्प्या-टप्प्याने तापमानात वाढ झाली. वाढत्या तापमानामुळे काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयासमोर धावत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली होती. रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास नांदेड रोडवर एका धावत्या कारला अचानक आग लागली. त्यानंतर चालकाने वाहन थांबून बाहेर पडला. आग वाढत असल्याने चालकासह स्थानिक नागरिकांची धावपळ सुरू झाली. काही वेळात स्थानिक नागरिकांनी टँकरच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौकामध्ये इतर वाहनधारकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.