चाकूर : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथून विदेशी दारू घेऊन कोल्हापूरकडे येणारा ट्रक रविवारी पहाटे दरोडेखोरांनी अडवून ७८ लाखांच्या दारूसह पळवून नेला होता. चाकूर पोलिसांनी या घटनेची तपासचक्रे गतिमान केली असून, यातील ट्रक रविवारी रात्री तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, दरोडेखोरांनी ट्रकमधील विदेशी दारू घेऊन पोबारा केला. त्यामुळे दरोडेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चाकूर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
धर्माबाद येथून शनिवारी विदेशी दारू भरून ट्रक क्रमांक (एमएच २६, एडी ३५८६) कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. तालुक्यातील आष्टामोडनजीक रविवारी मध्यरात्री टोलनाका पास झाल्यानंतर समोर एक जीप व कार आडवी लावून त्यातून ७ ते ८ दरोडेखोर उतरले. त्यांनी ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवत ट्रकचा ताबा घेतला. ट्रकमधील लोकांना धाक दाखवून त्यांच्या अंगावर चादर टाकून गप्प बसण्यास सांगितले. ट्रक बार्शी रोडवरून बोरगाव काळे परिसरात नेला. ट्रकमधील चालकासह अन्य लोकांना खाली उतरवून रस्त्यालगत शेतात दोरखंडाने बांधून तेथून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना समजताच गातेगाव, मुरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांना तामलवाडीजवळ आढळला ट्रक...पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तपासाच्या दृष्टीने सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक दतात्रय निकम यांनी चाकूर पोलिस ठाण्यातील पोलिस पथक तपासासाठी रवाना केले. पथकाने धर्माबाद ते बोरगाव काळे दरम्यानची सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली. मुरूडच्या पुढील भागाची माहिती घेतली. तेव्हा तुळजापूर - सोलापूर रस्त्यावरील तामलवाडी गावानजीक हा ट्रक पोलिसांना आढळला.
महामार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी...पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चाकूर पोलिस ठाण्यात आणला. परंतु, दरोडेखोरांनी ट्रकमधील ९९० विदेशी दारूचे बॉक्स घेऊन पोबारा केला आहे. चाकूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तपास करत आहे. धर्माबाद येथून विदेशी दारू भरून ट्रक निघाला तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तपास पोलिस गतीने करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्हींसह अन्य धागेदोरे मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत, असे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.