लातूर : महानगरपालिकेअंतर्गत लातूर शहरामध्ये एकूण १६ शाळा असून, यांतील काही शाळांना भौतिक सुविधा आहेत. मात्र काही शाळांना भौतिक सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खाडगाव रोड परिसरातील उर्दू माध्यमाची शाळा क्र. १४ ची अशी स्थिती असून पावसाळ्यात वर्गांत पाणी शिरते. इमारतच मोडकळीस आल्याने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे इमारत बदलून मिळण्याची मागणी होत आहे.
महापालिकेच्या १६ शाळांपैकी तीन शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत; तर उर्वरित १३ शाळा मराठी माध्यमाच्या असून, या सर्व शाळा मिळून चार-पाचशे मुले शिक्षण घेत आहेत. मात्र काही शाळांना इमारत आहे. भौतिक सुविधा नाहीत. आर्वी गायरानातील शाळेचा प्रश्न ‘लोकमत’ने उचलून धरला होता. जवळपास तशीच अवस्था उर्दू शाळा क्र. १४ ची आहे. भाड्याच्या इमारतीत असलेली ही शाळा मोडकळीस आली आहे. इमारत पडण्याचा धोका आहे.
ग्रीन बेल्ट किंवा इमारत बदलावीशाळा क्र. १४ ही इमारत भाड्याने घेतली असली तरी ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे इमारत दुसरी घ्यावी किंवा ग्रीन बेल्टमध्ये शाळेला जागा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे या शाळेत कसलीही सुविधा नाही. शौचालय नाही. पाण्याची की लाइटची सोय नाही.
दीड हजार रुपयांत सहा खोल्याया शाळेची इमारत भाड्याची आहे. त्यामुळे ती दुरुस्त करता येत नाही. सहा खोल्यांना महिन्याला फक्त दीड हजार रुपये भाडे आहे. या शाळेत शौचालयाची व्यवस्था नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात पाच खोल्या गळतात. पाण्याची व विजेची सुविधा नाही.
सुविधांचा अभावशाळेचे भाडे कमी असल्यामुळे महापालिका भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय, भाडे कमी असल्याने कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. असे असतानाही शाळा रिकामी करण्यासंदर्भातही घरमालकाकडून वारंवार तगादा होत असल्याचेही समजते.
इमारत बदलणे हा पर्यायउर्दू माध्यमाची ही शाळा पहिली ते चौथीपर्यंतची आहे. दोन शिक्षक असलेल्या या शाळेत एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षिका आहे. पटसंख्या चांगली आहे. मात्र सुविधांचा अभाव असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेची इमारत बदलणे हाच पर्याय असल्याचे सांगितले जाते.