लातूर : शहर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी औसा रोडवरील, राजीव गांधी चौक, छत्रपती चौक आणि रिंग रोड परिसरात वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ब्लॅक काचेचा वापर करणाऱ्या जवळपास १०२ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनधारकांवरही खटले दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील विविध मार्गावर नाकाबंदी करुन, चोरीतील मोटारसायकलींचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबिवली जाते. त्याचबरोबर लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील विविध प्रमुख मार्गावर, रिंग रोड परिसरात आणि चौका-चौकात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्यापासून वाहन तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी औसा रोडवरील राजीव गांधी चौक, छत्रपती चौक आणि रिंगरोड परिसरात वाहन तपासणी करण्यात आली. आजच्या तपासणीत काही वाहने ब्लॅक काच वापरल्याचे आढळून आले. शिवाय, सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. ब्लॅक काच वापरणे आणि सीटबेल्ट न वापरणाऱ्या एकूण १०२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, कर्मचारी, राजुळे, हासुळे, मनाळे, सुरवसे, डोंगरे, मठपती, कांबळे, केंद्रे, परगे, मुंडकर यांच्या पथकाने केली.